News not found!

वाचन जत्रेच्या निमित्ताने...

संक्षिप्त माहिती: 

शनिवार दिनांक 13 जून 2015, सायंकाळी 4-7, या कार्यक्रमासाठी आपल्याला मनापासून आमंत्रण!

खेळघराच्या खिडकीतून
पालकनीतीचे खेळघर
१. लक्ष्मीनगर कोथरूड, पुणे वस्तीमधील काम :-
• १ ली ते १०वीची शालेय मुले मुली अभ्यास गट, विचारांचा विकास.
• पालकांसमवेत काम- गृहभेटी , पालकसभा, शिबीर, विशेष कार्यक्रम.
• युवक प्रकल्प – दहावीच्या पुढील मुलांना शैक्षणिक मदत, मार्गदर्शन
गेली चार वर्षे खेळघरामध्ये आठवड्यातील ४-५ दिवस ,प्रत्येकी १५-२५ मुले असलेल्या आठ गटामध्ये वेगवेगळ्या वेळांना आणि वेगवेगळ्या जागांमध्ये काम चालू आहे .
२. महाराष्ट्रभर नवी खेळघरे सुरु व्हावीत यासाठीचे काम :-
• खेळघर संकल्पनाची ओळख करून देणारे पाच दिवसाचे निवासी शिबीर.
• नवी खेळघरे सुरु करू इच्छिणाऱ्या संस्था – व्यक्तीना गरजेनुसार मार्गदर्शन आणि प्रशिक्षण . १० नव्या खेळघराच्या माध्यमातून ८०० ते ९०० मुलांपर्यंत खेळघर पोचत आहे.
• खेळघरात राहून प्रत्यक्ष काम बघून शिक्नुयासाठी फेलोशिप कार्यक्रम .
• खेळघराच्या मॅन्यअलचे काम.
शिक्षण वंचितापर्यंत पोचावं, आनंदाच व्हावं या उद्देशानं “पालकनीती परिवार” संस्थेन सुरु केलेला खेळघर हा एक उपक्रम! सलग अठरा वर्षे, अनेक आव्हानाशी सामना करत हे काम उभं राहिलं, पुढे गेलं. आज कोथरूडमधल्या लक्ष्मिनगर येथील १५० मुला-मुलींबरोबर अर्थपूर्ण शिक्षणाचं हे काम जोमदारपणे चालू आहे.या झोपडवस्तीतील शंभराहून अधिक मुल-मुली आत्मविश्वासान स्वतःच्या पायावर उभी आहेत. प्रसन्न संवेदनशीलतेन आयुष्य जगात आहेत.
वंचीत मुलांचे प्रश्न,मानसिकता ,त्यांना नेमक काय आणि कसं शिकवायला हवं अशा मुद्याचा खेळघराने शास्त्रशुद्ध अभ्यास केला. वंचित मुलांसमवेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी या अभ्यासावर आधारित प्रशिक्षणाची रचना तयार केली आहे. अशा प्रशिक्षणाच्या माध्यामतून महाराष्ट्रात नऊ ठिकाणी खेळघरे सुरु झाली आहेत. यामधून आता सुमारे १००० मुलांपर्यंत खेळघर आता पोचले आहे.
पालकनीती खेळघराच्या या दोन्ही प्रकल्पातील काही ठळक उपक्रमांबद्दल या वार्तापत्रात माडणी केली आहे.

कलेच्या दालनात
kaladarshan.JPG
खेळ, कला आणि संवाद ही खेळघरातली तीन महत्वाची शिकण्याची माध्यमं!
खेळ मुलांना आतिशय प्रिय आणि संवादाला सहभागी पद्धतीत पर्यायच नाही त्यामुळे खेळ आणि संवाद हे खेळघराच्या रचनेचे अविभाज्य भाग असतातच. पण वर्गाच्या रचनेत कलेचा अंतर्भाव होण्यासाठी मात्र आवर्जून प्रयत्न करावे लागतात. याचे एक कारण म्हणजे ताईंनाही कलांची अनुभूती घेण्याची संधी मिळालेली नसते. त्यामुळे त्याही कलेशी फटकूनच वागतात.
ही उणीव भरून काढण्यासाठी जानेवारीमध्ये तायांसाठी कलेच्या शिबिराचं आयोजन केलं होतं. पालकनीतीचे विश्वस्त रमाकांत धनोकार हे चित्रकार आहेत. त्यांनी या शिबिराची जबाबदारी घेतली. शुभदा जोशींनी त्यांना मदत केली. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या क्षणांचं चित्र काढण्यापासून सत्राची सुरवात झाली. चित्रं काढता काढता सगळ्या ताया कधी स्वतःच्या भावविश्वात राममाण झाल्या हे समजलेच नाही.
त्यानंतर धनोकरांनी काही युक्त्यांची ओळख करून दिली. पातळ ट्रेसिंग कागद चुरगळून त्यावर पेस्टल कलर्सनी केलेल्या रंगलेपनातून आपसूक तयार होत जाणारे चित्रं, स्वतःच्या नावाच्या अक्षरांतून तयार होणारी चित्रं इत्यादी. हे पाहून, चित्रं काढणं काही अवघड नाही असं ताईच्या लक्षात येऊ लागलं. त्यामुळ मजा येऊ लागली. सर्वात धमाल आली कोलाज तयार करताना! कागदाच्या एका बाजूला जालरंगाचे मन मानेल तसे फराटे मारायचे. त्यानंतर तो कागद उलटा करून त्यावर हवं ते चित्र काढायचं. नंतर त्या रेघांवरून कापायचं. आता उलट बाजूनं रंगीत असे कापलेले तुकडे दुसऱ्या न केलेल्या कागदावर चिकटवायचे. या प्रक्रियेतून आधी कल्पनाही मस्त ,वेगळेच चित्र तयार होतं. या सगळ्या अनुभवांतून जाताना ताईंना खूप छान वाटत होते. ताजंतवानं झाल्यासारखं वाटत होतं.
या शिदोरीच्या आधारावर तायांनी मुलांबरोबर कलेच्या पंधरवडयाची आखणी केली. मुलांच्या अनुभवांशी जोडून घेत ठसे चित्रं, दोरा चित्रं, नावांची चित्रं, पानांची चित्रं, कोलाज अशा अनेक चित्रप्रकारांमध्ये मुलं अगदी रमून गेली. संवादातून चित्रांच्या दुनियेत शिरणे तसेच चित्रांवर गटात बोलणं, त्यावर लिहिणं अशा प्रकारे मुलं भाषेशी जोडून घेत कलेच्या दुनियेत मनसोक्त विहार करत होती. आपण इतकी सुंदर चित्रे काढू शकतो यावर मुलांचा विश्वासच बसत नव्हता.
मुलांबरोबरच्या गप्पांतून या चित्रांचे प्रदर्शन भरवावे अशी टूम निघाली. मुलांना आपलं काम पालकांना दाखवावं असं मनापासून वाटत होतं. ताई आणि मुलांनी मोठ्या परिश्रमांनी दोन्ही आनद्संकुलच्या वास्तू सजवल्या. १६ मार्चला सायंकाळी ५ वाजता धनोकार आणि आभा भागवत यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. मुलं आपापल्या पालकांना घेऊन आली. त्यांना सारी चित्रे दाखवली. ती कशी काढली हे समजून सांगितलं. एका बाजूला LCD player वर गेल्या पंधरवड्यातील चित्रप्रक्रियेचे फोटो दाखवले जात होते. कलेचा मुलांच्या विकासाला कसा हातभार लागतो याबद्दल ताई पालकाशी बोलत होत्या.
पालकांनी आम्हालाही अशी चित्रे काढण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
मुलांचा आनंद, रमून जाणं, आपण होऊन बोलायला, लिहायला तयार होणं, वेळेचं भान न राहाणं हे फार सुंदर होतं. कला हा विषय यापुढे वर्गरचनेचा महत्वाचा भाग बनेल असा विश्वास ताईंनाही वाटू लागला.

भूमिती शिबीर
bhumiti_0.JPG
भूमितीतील मुलभूत आकार आजूबाजूला सहज दिसतात, पण त्यांच्याकडे जाणीवपूर्वक मुलांचे लक्ष वेधून घेऊन ते पाठ्य-विषयाशी जोडणं आवश्यक असतं. भूमितीतील बऱ्याच संकल्पना अमूर्त आहेत. त्यामुळे त्या समजण मुलांना अवघड जातं. म्हणून पहिलीपासून सर्व गटात सलग आठ दिवस मुलांबरोबर भूमितीच्या संकल्पनांवर काम करावं असं ठरवलं.
मुलांच्या समजेच्या टप्प्यांप्रमाणे प्रत्येक समजणं गटाचा उद्देश ठरवून आमच्या अभ्यासाची सुरुवात झाली. त्यासाठी प्रत्येक इयत्तेची पाठ्यपुस्तकं आणि NCERT ची पाठ्यपुस्तकं यांचा संदर्भ घेऊन काम केलं. प्रत्येक ताईने आपल्या गटात त्यातल्या कोणत्या संकल्पना घेता येतील याचा अंदाज घेऊन अभ्यासक्रम ठरवला. खेळ आणि उपक्रमही ठरले.
पहिलीच्या गटात मुलभूत आकार, त्यांची नावं, ते शब्द वाचता येणं, आकार व नावाच्या जोडया लावणं, त्या आकारांच्या आजूबाजूच्या वस्तू सांगणं आणि याचा वेगवेगळ्या उपक्रमातून सराव असं घ्यायचं ठरलं. सुरुवातीला त्रिकोण, आयत, चौरस व वर्तुळ हे आकार, त्यांची शब्द्कार्डे अशी ओळख झाली. मग आयत व चौरसातला फरक सांगितला. तो त्यांना नजरेने कळत होता पण शब्दात नीट सांगता येत नव्हता. मग काड्यापेटीच्या काड्या घेऊन ते आकार त्यांना बनवायला दिले. त्यातून त्यांना तो छान स्पष्ट झाला.
त्यांना द्विमितीय व त्रिमितीय आकारातला फरकही सोप्या शब्दात समजून सांगावा असं आम्हाला वाटत होतं कारण असे आकार त्यांना आजूबाजूला दिसत असतात. पण कदाचित मुलांना हे समजणार नाही की काय अशी शंका मनात होती. शेवटी ‘करून तर पाहू’ म्हणून ते घ्यायचं ठरवलं. मग वर्तुळाकार आणि गोलाकार अशा वस्तू दाखवून त्यांची चर्चा झाली. त्यातील फरक मुलांना कळत होता पण पुरेसा स्पष्ट झाला नव्हता. म्हणून फळ्यावर एका बाजूला गोल व दुसरया बाजूला वर्तुळ आकाराच्या वस्तूंची यादी केली. तेंव्हा सोनाली पटकन म्हणाली,” ओ ताई, शून्याचा आकार पण वर्तुळच असतो ना?” सुरुवातीला एकदोन वस्तू सांगितल्यावर मुलांकडून वस्तूंची नावं भराभर आली. यामुळे आमचा हुरूप वाढत होता आणि मुलांना संकल्पना स्पष्ट होत होती. दुसऱ्या दिवशी उजळणी घेतली तेंव्हा मुलांना द्विमितीय व त्रिमितीय वस्तूंमधला फरक समजला आहे असं दिसलं. मग शंकू आणि त्रिकोण यातला फरक वस्तूंच्या मदतीने स्पष्ट करून दाखवला. फळ्यावर यादी करायला सुरुवात केल्यावर मुलांनी आजूबाजूच्या अशा आकारांच्या वस्तूंची नावं भराभर सांगितली. त्यानंतर काही चित्रांची कार्डे देऊन मुलांना त्याचे वर्गीकरण करण्यास सांगितलं. वर्गीकरण करताना काही मुलांना मदत लागली त्यावेळी बाकीच्या मुलांनी मदत केली.
अमूर्त संकल्पना मुलांना इतक्यात समजणार नाही म्हणून शिकवायला नकोत असा आपण नकळत विचार करतो आणि शिकवत नाही. पण यावेळी अशी शंका बाजूला ठेवून आम्ही आणि मुलांनीही काठिण्यपातळी ओलांडली याचा आनंद मनात होता.
मोठ्या गटांबरोबरही अशाच पद्धतीने मुलभूत संकल्पना वेगवेगळ्या कल्पना आणि उपक्रम वापरून घेतल्या.
उदाहरणार्थ- सममिती शिकवताना - मराठी आणि इंग्रजीतील कोणती अक्षरे सममित आहेत आणि कोणती नाहीत हे शोधणे, ठिपक्यांचे कागद वापरून कोन, त्रिकोण, चौकोन, आयत आणि चौरस काढणे, निरनिराळे आकृतिबंध काढणे असे मुलांना खूप आवडणारे कृतीकार्यक्रम झाले. त्याने भूमितीसंदार्भातला मुलान्चानी तयांचाही मानसिक अडथळा दूर होण्यास मदत झाली.
वाचनजत्रेच्या निमित्ताने.....
“खेळघराच्या खिडकीतून ” चे हे लिखाण करतानाच आमची वाचनजत्रेची तयारी चालू आहे. मुलांना वाचनाची भूक लागावी आणि ती भूक भागावी हा या जत्रेचा उद्देश आहे. काम उत्साहात चालू आहे,पण अजून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे त्याबद्दल वाचण्यासाठी पुढच्या वार्तापत्रात वाचायला मिळेल.
लक्ष्मीनगर वस्तीतील मुक्त वाचनालय
open lib.jpg

यावर्षी जुलेपासून आम्ही लक्ष्मीनगर वस्तीत दोन ठिकाणी वाचनालय सुरु केले त्यामुळे आम्हाला अधिकाधिक मुले व लोकांपर्यंत पोहोचता येत आहे. व आमचे या वस्तीतील लोकांचे नाते अजूनच दृढ होत आहे. या वाचनालयामुळे मुलासमोर एक वेगळेच विश्व खुले होण्यास मदत होत आहे.
सुरुवातीला हे वाचनालय आम्ही मारुतीच्या देवळासमोरील जागेत आठवडयातून एकदा शनिवारी दोन तासांसाठी भरवत होतो पण मुलांचा उत्तम प्रतिसाद व त्यांचा नवीन शिकण्यातील व वाचनातील रस बघून आम्ही आता ते वस्तीतील समाज मंदिरात दर गुरुवारी सुद्धा वाचनालय सुरु केले आहे.
साधारणपणे ३० पुस्तके घेऊन जाते ह्यामध्ये पुस्तके अतिशय काळजीपूर्वक, वयानुरूप निवडलेली असतात अगदी लहान्मुलासाठी चित्राची पुस्तके तर काही मोठी चित्रे व एक दोन वाक्ये असलेली पुस्तके असतात तर मोठ्या मुलांसाठी जरा मोठी पुस्तके निवडलेली असतात. ताई कट्ट्यावर पुस्तके पसरून ठेवते मुले आपल्या आवडीची पुस्तके घेऊन तेथेच वाचत बसतात मुलांना पुस्तके निवडण्याचे पूर्ण मुभा असते कधी कधी लहान मुलांना ताई पुस्तके वाचूही दाखविते. एक मोठ मुलगा तर न चुकता या वाचनाल्याला हजेरी लावतो व अनेक पुस्तके वाचतो हा मुलगा एके ठिकाणी नोकरी करतो पण त्याची ही वैचारिक भूक भागविण्यात खेळघराचा खारीचा वाटा आम्हाला नक्कीच आनंद देऊन जातो. सर्वसाधारणपणे १५-२० मुले पालक व कधी कधी दुकानदार सुद्धा
तेथील पुस्तके वाचतात मारुतीमंदीरच्या आजुबाज्च्या पालकांना हा उपक्रम इतका आवडतो की तेथील जागा स्वच्छ करतात व आजुबाजूच्या मुलांना बोलावून आणतात.पुस्तके खूप हाताळल्यामुथे लवकर खराब होत आहेत.त्यामुळे नवनवीन पुस्तकांची त्यात भर टाकण्याची व नित जड प्लास्टिक कव्हर घालण्याची एक नवी गरज निर्माण झाली आहे व तेव्हा या उपक्रमाला आपली भरघोस मदत मिळावी ही आमची मन:पूर्वक इच्छा आहे.
खेळघर संकल्पनेचा विस्तार प्रकल्प
akot photo_0.JPG
२००७ पासून हा प्रकल्प सर रतन टाटा ट्रस्टच्या मदतीने सुरु झाला. खेळघराच्या माध्यमातून आम्ही सर्जनशील, अर्थपूर्ण, आनंददायी पद्धतींचा प्रत्यक्ष मुलांबरोबरच्या कामाचा अनुभव घेतलेला आहे. या कामातून जे काही नव्यानं समजलं ते अनौपचारिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था व व्यक्तींसोबत वाटून घेण्याचं ठरविलं. त्यातूनच खेळघराच्या प्रशिक्षणांचा कार्यक्रम सुरू झाला. दर वर्षी खेळघरातर्फे पाच दिवसांचे निवासी शिबीर घेतलं जातं. सुरु झाले. ज्या व्यक्ती आणि संस्था आपापल्या ठिकाणी नवी खेळघरं सुरू करतात त्यांना पालकनीती खेळघराकडून काम उभं राहणं आणि कार्यकर्ते तयार होण्यासाठी प्रशिक्षण देणं यासाठी मदत मिळते. वर्षातील २० ते २२ दिवस हे प्रशिक्षण होते. खेळघर हस्तपुस्तिका वापरून हे प्रशिक्षण घेतले जाते. या हस्तपुस्तिकेची मदत कार्यकर्त्यांना पुढील काळात स्वतःचा अभ्यास व उपक्रमांची आखणी करण्यासाठी होतो.
सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी चालू असलेली खेळघरं.
क्रमांक संस्थेचं नाव व काम सुरू झाल्याचं साल खेळघरांची संख्या मुलांची संख्या समुदायाचा प्रकार कार्यकर्त्यांचं वेगळेपण
१ समिधा, पुणे २००९ १ २० शहरी वस्ती स्वंयसेवी कार्येकर्ते
२ नारी समता मंच, मुळशी 200९ ९ २८१ आदिवासी पाडे पाड्यावरील ८-१० ची मुलेवी
३ पालकमंच संवेदना गट, कोल्हापूर २०१० ३ ११० शहरी वस्ती स्वंयसेवी कार्येकर्ते
४ सामर्थ्य, उमरगा २०११ ५ १३५ लमाणी वस्ती स्वंयसेवी कार्येकर्ते
५ अक्षरा, मुळशी २०११ ८ ११० ग्रामीण भाग नेमलेले शिक्षक
६ भारतीय शिक्षण संस्था, नागपूर २०१३ १५ ४१५ आदिवासी पाडे पाड्यावरील शिक्षक
७ भारत फोर्ज कंपनी, मुंढवा २०१४ १ ५० शहरी वस्ती नेमलेले शिक्षक
८ ग्यानप्रकाश फौंडेशन, पुणे २०१५ १ ५० शहरी वस्ती नेमलेले शिक्षक
९ उन्नती, अकोट २०१५ ७ १४० आदिवासी पाडा पाड्यावरील शिक्षक
ज्यांना खेळघरासारखे काम करायची इच्छा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्यांच्या खेळघराचं काम उभे राहीपर्यंत आम्ही मदतीला आहोत.
खेळघर हस्तपुस्तिका
“ आनंदाने शिकण्याचा दिशेने ” ही खेळघराची हस्तपुस्तिका लवकरच तयार होत आहे. गेल्या १९ वर्षाच्या खेळघराच्या कामातून आमच्या हाती लागलेल्या संकल्पना पद्धतीत उपक्रम यांची या पुस्तिकेत सविस्तर माडणी आहे.
पुढील वार्तापत्रात याबद्दल अधिक सविस्तार बोलू! शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ,रस असणाऱ्या प्रत्येकासाठी या पुस्तिकेची मदत होईल ,असा विश्वास वाटतो.
युवकगट
खेळघरातील दहावी पास झालेल्या मुलांसोबत दर सोमवारी तीन तास वस्तीत युवक गट चालतो. यात मुलांच्या प्रश्नांवर, अडचणींवर चर्चा होते. त्याचबरोबर वस्तीतील, समाजातील महत्वाच्या घडामोडींवर चर्चा होते. हा गट घेण्याचा उद्देश, या मुलामुलींनी पुढचं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहावं हा आहे. याबरोबरच वस्तीतील इतर आकर्षणे –व्यसने, गुंडगिरी, प्रेमप्रकरणे, राजकीय पक्षांचा प्रभाव यापासून दूर राहणं, सामाजिक बांधिलकी जपणं हेही अपेक्षित असते व त्या दृष्टीने विचार करून उपक्रम आखले जातात. त्यांचा कल आणि क्षमतानुसार त्यांनी कोणता कोर्स निवडावा यासाठी मार्गदर्शन केलं जातं.
सध्या खेळघरातून शिकून बाहेर पडलेली ७-८ मुलेमुली स्वतःच्या पायावर उभी राहून घराला आर्थिक आधार देत आहेत. शिवाय घरातील लोकांबरोबर चर्चा करून भावंडांच्या व स्वतःच्या लग्न किंवा नोकरी या विषयांवर आपली मते ठामपणे मांडत आहेत. त्यांच्यामधले हे सकारात्मक बदल आम्हाला आनंद देणारे आहेत.
खेळघराच्या मित्र गटापैकी अनेकांनी दरवर्षी आर्थिक मदत पुरवून या मुलांच्या शिक्षणाला हातभार लावला आहे.
सध्या मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी सर्च संस्थेच्या निर्माण या गटातर्फे काही कृतीकार्यक्रम आखला आहे. त्यात भाग घेण्यासाठी या गटातून ३ मुली व १ मुलगा १० दिवसासाठी गेले आहेत.
प्रिय मित्र,
स्वतःसाठी, मुलांसाठी, वंचितांसाठी शिकण्यातला आनंद शोधणं हे तुम्हाला , आम्हाला आणि खेळघराला महत्वाच वाटतं. सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्याखेरीज हे स्वप्न प्रत्यक्षात येणं शक्य नाही म्हणूनच तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.
गेल्या वर्षी खेळघरासमोर गंभीर असा आर्थिक प्रश्न उभा राहिला होता. जवळपास वर्षभर खेळघरात कोणत्याही निधी पुरवणाऱ्या संस्थेची मदत उपलब्ध नव्हती.
या काळात आपल्यासारख्या अनेक मित्रांनी आत्मयतेने ,पुढाकार घेऊन वेगवेगळ्या प्रकारे कामात मदत केली. आर्थिक हातभारही लावला.आणि त्यामुळेच हे काम सक्षमतेने पुढे नेऊ शकलो.
त्यानंतर पुढील तीन वर्षांकरिता सर रतन टाटा ट्रस्ट चा निधी उपलब्ध झाला. आर्थिक विवंचना थोडी फार कमी झाली. अर्थात हा निधी खेळघराच्या एकूण खर्चाच्या ६० टक्केच रकमे इतका आहे. बाकी रक्कम आपल्यालाच उभी करायची आहे. या तीन वर्षांकरिता दिलेली मदत ही शेवटचीच असेल हे सर रतन टाटा ट्रस्टने सुतोवाच केले आहे.
आता जरी हुरुपाने काम चालू केले आहे तरी त्या ९ महिन्यांच्या काळाने आम्हाला खूप काही शिकवले असे म्हणता येईल .बाकी कशाचेही सोंग आणता आले तरी पैशाचे सोंग आणता येत नाही हे पुरेपूर समजले.त्यामुळे जागे होऊन पुढील काळात ही आपली साथ असेल तरच काम चालू राहिलं हे निश्चित!
खेळघरात अत्यंत उत्साहाने अनेक पातळ्यावर काम चालू असते. मुलांसमवेत आम्ही सगळे आंनदान या कामात रस घेतो. या आनंदात आपल्यालाही सहभागी होतो यावं म्हणून “ खेळघराच्या खिडकीतून ” या वार्तापत्राच्या माध्यामतून आपल्यापर्यंत पोचायचे ठरवले आहे.
तसेच आपल्याला खेळघरातल्या मुल-कार्यकार्त्यांबरोबर संवाद साधायची संधी मिळावी यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
खेळघरातल्या वाचन जत्रेच्या निमित्ताने .......
शनिवार दिनाक १३ जून २०१५, सायंकाळी ४ – ७ या कार्यक्रमासाठी आपल्याला मन:पूर्वक आमंत्रण !
खेळघराच्या कामात आपल्याला विविध पद्धतीनी सहभागी होता येईल .
१. मुलांशी संवाद साधण्यासाठी, त्यांना आपल्याजवळील एखादे कौशल्य शिकवण्यासाठी, खेळघरातल्या व्यवस्थेच्या कामात मदत करण्यासाठी आपण वेळ देऊ शकता.
२. आपल्यासारख्या काही मित्रांनी जर दरवर्षी खेळ घरतल्या एका किवा काही मुलांमागे येणाऱ्या खर्चाची जबाबदारी घेतली तर या आर्थिक आव्हानांना समोर जाण्याच बळ अम्हाला मिळेल. एकेका मुलामागे वर्षभ्रसाठी खेळ
घराला येणारा खर्च सर्वसाधारणपणे असा आहे.
१ ली ते ६ वी मधील मुलं – ८००० /-
७ वी ते १० अम्धील मुलं- १००००/-
शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी १० वी नंतरची शिक्षणासाठी या मुलांना खेळघराकडून २०००० पर्यंत मदत दिली जाते.
३. सर रतन टाटा ट्रस्ट तर्फे खेल्घ्रतील पहिली ते सहावीच्या सुमारे ११० मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मात मिळते.परंतु सातवी ते दहावी आणि युवक गटाच्या मुलांसाठी मात्र आर्थिक मदतीची गरज आहे. आठवड्याचे ५ दिवस ३ तासासाठी मुले खेळघरात येतात.२०ते २५ मुलांबरोबर एक शिक्षिका काम कर्ते. भाषा,गणित आणि जीवन कौशल्ये यासारख्या विषयांवर काम होते. आरोग्य, स्वओळख ,संवाद कौशल्ये, भावनांचे समायोजन अशा विषयावरील काम मुलांची व्यक्तिमत्वे समृद्ध कर्ते. सर्वधर्मसमभाव, लिंगाधारित भेद्भाव, हिंसेला विरोध अशा विषयांवरच्या चर्चायांच्या माध्यमातून मुलांच्या जाणिवांचा विकास होतो.
३. वह्या, पुस्तके, स्टेशनरी , खेळणी अशा गोष्टी वस्तुरूपात अथवा देणगी रुपात देता येईल.
४. खेळघरात मुलांना आठवड्यातून दोनदा पौष्टिक खाऊ दिला जातो त्याचा खर्च ६०००/- रुपये असा होतो.
५. वर्षातून एकदा मुलांची सहल नेली जाते. त्याचा खर्च २००००/- ते २५०००/- असा येतो .
६. खेळघरातील विशेष कार्यक्रमामध्ये आपला सहभाग मिळाला तर ते अधिक सक्षमतेने साकार होतील.

संपर्क-
खेळघर
गुरुप्रसाद अपार्टमेंट, २३, आनंदनिकेतन सोसायटी, कर्वेनगर,पुणे- ४११०५२.
फोन-०२०-२५४५७३२८, ९८२२८७८०९६,
९८२२०९४०९५,९७६३७०४९३०
E-mail :khelghar@gmail.com

पालकनीती परिवार
अमृता क्लिनिक, प्रयास आठवले कॉर्नर,
संभाजी पुलाजवळ कर्वे रोड, पुणे – ४११००४.
फोन-०२०- २५४४१२३०
Website-www.palakniti.org